क्रीडा

मुंबईने केले कोलकाताला ९ गडी राखून पराभूत, हैदराबाद प्ले ऑफ्समध्ये

वानखेडे मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून पराभूत केले. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले. प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना कोलकात्याला १३३ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आणि मुंबईला १३४ धावांचे आव्हान दिले. १३४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डी कॉक याने चांगली सुरुवात केली, पण मोठा फटका खेळताना तो माघारी परतला. त्याने ३० धावा केल्या. पण रोहित शर्मा पाय रोवून मैदानावर उभा राहिला आणि सामन्यात अर्धशतक केले. रोहितने ८ चौकारांसह ५५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने रोहितला उत्तम साथ दिली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४६ धावा केल्या.

पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या धावगतीवर अंकुश ठेवला. कोलकाताकडून ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ लाभू शकली नाही. ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे कोलकाताचा संघ मोठी भागीदारी रचू शकला नाही.

मुंबईकडून लसिथ मलिंगाने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेत चांगली साथ दिली.

322
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *