मुंबई राजकीय

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम, छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच.

छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच!शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिले आदेश.

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छीविक्रेत्या कोळी महिलांचे तात्पुरते स्थलांतर कुलाबा आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरातच करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त प्रवीण परदेशी आणि पालिका प्रशासनासोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेकडो भूमिपुत्र, मच्छीविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून ऐरोलीच्या स्थलांतरणाचे गंडांतर टळल्याने रोजगार वाचला आहे.

क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत जीर्ण झाल्याचे सांगत मच्छीविक्रेत्यांना ऐरोलीला हलवण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला होता. 1 ऑगस्टपासून हे मार्केट ऐरोलीला स्थलांतरित करण्याची नोटीसही पालिकेने इथल्या मच्छीविक्रेत्यांना दिली. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल आणि मच्छी व्यवसायासंबंधित लोकांचा रोजगार बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. शिवाय वर्षानुवर्षे या ठिकाणी सुरू असणारा व्यवसाय बुडाल्याने मच्छीविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतरण जवळच्याच परिसरात करावे असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले होते.

याबाबत आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चेनंतर मंडईतील मच्छीमारांचे स्थलांतर जवळच्याच परिसरात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, नगरसेवक आशीष चेंबूरकर, मिलिंद वैद्य, मच्छीमार संघटनेचे दामोदर तांडेल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, परवाना विभागाच्या संगीता हसनाळे आदी उपस्थित होते.

दहा लाख लोकांचा रोजगार वाचणार 
गेल्या 40 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेले आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात माशांची खरेदी-विक्री होते. सुमारे दहा लाख लोक या मासे व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे या ठिकाणची मंडई ऐरोलीला नेल्यास या लाखो लोकांचा रोजगार बुडणार होता, मात्र आता हे मच्छीमार्केटचे स्थलांतर मंडईजवळच्याच परिसरात करण्यात येणार असल्याने दहा लाख लोकांचा रोजगार वाचणार आहे.

तीन वर्षात काम पूर्ण झाल्यावर पुन्हा त्याच जागी स्थलांतर.
छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत जीर्ण झाल्यामुळे ऐरोली येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. मात्र ही इमारत खरोखरच जीर्ण झाली आहे याबाबतचा संबंधित समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी किमान तीन वर्षे लागणार असून यानंतर याच ठिकाणी सर्व मच्छीविक्रेत्यांना जागा देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

75
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

One thought on “शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम, छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *